Monday 20 April 2020

त्या नजरेतील वास्तव

ठिकाण बुधवार पेठ:
आज रविवार सुट्टीचा दिवस ,भयंकर गर्दी एकदाची गाडी मंडईच्या पार्किंग मध्ये पार्क केली. आणि जीवात जीव आला. रविवारी दुपारी पार्किंग मिळणं म्हणजे अश्यक्य गोष्ट वा आधी देवाचे आभार मानले. आज तर आमचा शॉपिंगचा प्लॅन होता. आम्ही सगळे बहिण भाऊ वेगवेगळ्या ठिकाणी राहतो, त्यामुळे सगळे वेगवेगळेच आले. एव्हाना ते दुकानात गेलेही होते. मला लोकेशन पाठवलं होत. ताराचंद दाखवत होत. हे दुकान काही माझ्या परिचयाच नव्हतं. त्यामुळे मी कॉल करून विचारण्या पेक्षा सरळ मॅप चा आधार घेतला आणि पायीच निघाले. आणि मग काय जे सगळ्यांच कधी कधी ना कधी होत तेच आज माझं झालं मी ही गेले "त्या" एरिया मध्ये हे मला तेव्हा कळाल जेव्हा मला तिथे  त्या दिसल्या . मी तिथे पोहचली होती जी वस्ती सो कॉल्ड सभ्य लोकांची नाही. क्षणाचा ही विलंब न लावता मी पावलांचा वेग वाढवला. एकदा आतापर्यंत फक्त ऐकलेलं च होत हे सगळं. ते ही दबक्या आवाजांमध्ये. आता प्रत्यक्ष डोळ्यांसमोर दिसत होतं एक वेगळंच जग. प्रसिद्ध शहरातील कुप्रसिद्ध ठिकाण बुधवार पेठ. छोटा रस्ता एकमेकींना खेटून उभ्या राहिलेल्या त्या सगळ्या इतकी गर्दी , आणि स्वच्छता नावाचा प्रकार ही तिथे दिसत नव्हता वाटलं परत जावं आणि दुसऱ्या रस्त्याने जावं. पण मॅप फक्त 2 मिनिट्स दाखवत होत म्हणून चालत राहिले. त्यात त्यांचे ते इशारे शी मला तर किळासच येत होती. मनात फार राग होता ह्या बायकांबद्दल म्हणूनच तुच्छतेने का होईना पण वर बघायचं ठरवलं आणि मी तिच्या कडे एक तिरका कटाक्ष टाकला. आणि काय योगायोग तिनेही माझ्याकडे पाहिलं. मी लगेच समोर बघितलं खूप होत्या तिच्या सारख्याच कमी जास्त वयाच्या. शी किती घाणेरडी mentality आहे ह्यांची दुसऱ्यांना आकर्षित करण्यासाठी किती exposed करायचं!. तितक्यात खांद्यावर एक हात पडला थांब....!!!!!
तो आवाज ऐकून राग, द्वेष , भीती सगळं एकदाच उफाळून आल. आणि तिच्या त्या हाताच्या स्पर्शाने तर मला शिसारीच आली. मी मागे वळून पाहिलं ती च होती. साधारण माझ्याच वयाची. हो तीही विसीतलीच असणार  भडक मेकअप, डार्क लिपस्टिक, आणि डीप गळ्याचा टॉप खाली सलवार आणि ओढणी का घेतली हवं हेच कळत नव्हतं. कारण त्याचा उपयोग तर होताना दिसत नव्हता.आणि त्यात तिने कुठलातरी लो क्वालिटी परफ्यूम मारला होता तो वास तर एकदम डोक्यातच गेला
सगळंच कस अगदी लो क्वालिटी च वाटत होतं. 
काय काम आहे? मी थोड वरच्या आवाजातच विचारल. भीती मलाही वाटत होती पण दाखवायची नव्हती.

का बघत होती? तीने सरळ प्रश्न केला.
आता माझ्या कडे उत्तर नव्हते. असच लक्ष गेलं मीही नजर चोरत उत्तर दिलं.

इतना क्यू डर रही?
तिच्या त्या भाषेवरून आणि चेहऱ्यावरून नक्कीच ती महाराष्ट्रातील नव्हती हे कळत होतं. पण मराठी तितकीशी बोलता येत नसली तरी समजत मात्र नक्की असावी तिला.

नाही मी का घाबरू ! मी उगाचच आव आणत म्हणाले.

मुझे बाकीका तो पढना नहीं आता लेकींन चेहरे बहुत अच्छी तरह से पढने आते हे!

आता मात्र मी अगदी निरुत्तर च झाले एरवी सडेतोड उत्तरे देणारी मी आता शब्दच सुचत नव्हते. आणि मी हिला का बोलतीये? चल निघ इथून माझ्या मनाचा आतून आवाज आला आणि मी म्हणाले. उशीर होतोय !

रुक लेट हो रहा हे या शरम आरी मेरेसे बात करनेमे?

तिच्या ह्या प्रश्नाने माझा चेहराच पाहण्यासारखा झाला. हिला कस कळलं? काय करू थांबू का ऐकू का हिला काय म्हणायचं की जाऊ? पण पुन्हा कधी अशी कोणी बोलणारी भेटेल? आणि मी तिचं ऐकायचं ठरवलं.

बोल काय म्हणायचं आहे तुला?

पुछना तो तुझे था ना? क्या सोच क्या रही थी?
आता मात्र मलाही माझ्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे हवी होती.

का करतेस हे सगळं? आयुष्य खूप सुंदर आहे अग.

माझ्या ह्या बोलण्यावर ती फक्त हसली ते हसणं खूप भेसूर वाटत होतं.

बस ये बोलणा था निकल! ती म्हणाली.

मला कळलच नाही ती अशी का बोलतीये. मी तिच्याच चेहऱ्याकडे पाहत राहिले.

हिंदी समझती नही क्या निघ इथून! खूप भेटतात तुझ्यासारखे भाषण देणारे! आणि तिने पुन्हा इशारे करायला सुरुवात केली.

पर एक बार सुन तो मेरी बात. मी तिला म्हणाले.

तु गयी नही अब तक! क्यू धंदे के टाईम पर दिमाग चाट री हे। जा ना अपने रास्ते.

काय भाषा मला तर ते ऐकूनच किळस येत होती. पण म्हंटल ह्या नंतर तर मी इथे येणार नाही. मग आज ही अनायसे भेटली तर बोलूनच घेवू.

हे बघ तु मला थांबवलं आता मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्या शिवाय मी जाणार नाही.  मी ही थोडं निर्धारानेच बोलले. तशी ती थोडी चमकली.कितीतरी वेळ ती काही बोललीच नाही पण मी ही हटणार नाही म्हंटल्यावर. तीने बोलायला सुरुवात केली.

हे बघ आम्ही अस जर केलं नाही तर आम्हाला जेवायला मिळणार नाही. बस इतना काफी हे तेरे लिये! जा अब , ती म्हणाली.

अग पण बाहेर खुप नोकऱ्या आहेत, कुठलही काम करावं कष्टाचं खावं, शांत झोपावं. अस वाटत नाही का तुला? मी म्हणाले.

ये आम्ही काही हरामाच खात नाही हा...! दिवसभर  उभं राहून एखाद गिऱ्हाईक मिळत, आणि त्यानंतर होणार त्रास छोड, हम जैसो को तो एखादा गिऱ्हाईक मुश्किल से मिलता, तिकडे बघ रेश्मा, तिने एका बाई कडे हात दाखवला, अभि 35 की हुई ये, एकेकाळी खुप कमावलं तिने आता बघ आठ आठ दिवस कुणी पाहत पण नाही तिच्याकडे, आणि काय ग आम्ही बाहेर पडलो तर लोक देतील आम्हाला नोकऱ्या कुठून आलो सांगितलंकिच चार हात दूर पळतील  आणि दुरुन त्याच घाणेरड्या नजरांनी पाहतील. आमच्या सारख्या बायका आहेत म्हणून तुम्ही इतकं चांगलं जगु शकत आहे. नाहीतर हया जनावरांनी तुमचा जीव घेतला असता. मी आज ठरवलं ना बाहेर निघायचं तरीही नाही निघू शकणार , कारण तुमच्या सारखे सभ्य लोक आम्हाला जगु देणार नाही, भूतकाळातील त्याच खपल्या काढून पुन्हा जखमा देतील. इसलीये नही निकलना मेरको यहासे!

एक सांगशील..??

अब नही बोली तो भी तु थोडी ना सूनने वाली ती थोडं हसुन म्हणाली.

तिला अस हसताना पाहून माझ्याचेहऱ्यावर पण हसु उमटलं. 
तुझ्या कडे  इतके जण येतात , मग प्रेम अस कधी कुणावर झालं नाही का..?

ह्यावर ती कुत्सिक हसली, इस दुनियाका सबसे बडा झूठ क्या हे पता हे..? प्रेम..., समर्पण! जर कुणी कुणावर खर प्रेम केलं असत तर आमची गरजच नसती. इथे फक्त लोक शारीरिक भुक भागवायला येतात,  त्यांना त्यांच्या शरीराची भुक भागवायची असते आणि मला पोटाची.भावनांना आमच्या एरियात किंमत नाही. 
ती बोलत होती त्यातला एकूण एक शब्द जरी खरा होता. तरी ह्या गोष्टी पचवायला खुप जड चालल्या होत्या, कुठल्या समाजात राहतो आपण ? इथे महिलादिनाच्या दिवशी महिला काय आहेत हे सांगून सांगून थकत नव्हते कुणी तर दुसरीकडे हीच एक महिला आपल्या पोटासाठी , नाही फक्त दोन वेळच्या भुकेसाठी स्वतःला रोज विकते , अजून काय दुर्दैव म्हणावं. ना घर , ना दार, कुणी विचारणार नाही, कुणाला तिच्याशी काही घेणेदेणे नाही, तिच्या भावनां तर जणू तिने केव्हाच दफन केल्या. विचार केला तर सगळच कठीण ,आपण फक्त तिला वाईट, घाणेरडी, वेश्या हे टॅग लावुन मोकळे. पण तिला हे बनवणारे पण आपल्या पैकीच आहेत हे मात्र आपण विसरून जातो.

इतक्यात माझा फोन वाजला, 
अग किती वेळ आम्ही वाट पाहतोय..? समोरून माझा भाऊ होता.

हो आलीच दोन मिनिटं!

जा , होगया ना अब! ती म्हणाली.

हा, तुझं नाव काय म्हणाली.

रेश्मा, शंणो, गुलाबो, डॉली, हेमा जो तेरेको अच्छा लगे ओ! यहा घंटो मे नाम बदलते हे !

बापरे, हिला काहीही वाटत नाही आहे, आणि मला कालच माझं आणि माझ्या आईच  नावावरुन झालेलं भांडण आठवलं. माझं घरी एक आणि बाहेर एक अशी दोन नाव का ह्यावरून किती बोलली मी आईला.  आणि हिची तर काही अशी नावाने ओळखच नाही.

और सुन , ती म्हणाली.

क्या...?

अब कभी गलतीसे भी इस रास्ते मत दिखाना, इकडे आलेल्या कुठल्याच मुलीला चांगल्या नजरेने नाही पाहत, ती बोलत होती.

तितक्यात तिच्याकडे एक माणुस येत होता दलाल असावा बहुतेक. तिने त्याला येताना पाहिलं. आणि मला निघण्याचा इशारा केला. 
मी ही काही न बोलता निघाले, एव्हाना माझा साधेपणाचा माज, तिच्या भपकेपणाची घृणा सगळच गळून पडलं होतं. तिने जर तस केलं नाही तर ती जगु शकणार नाही, ह्या सत्याची जाणीव झाली होती. आता तिच्या मनातल्या रागाची जागा करुणेने घेतली होती. एक जळजळीत सत्य ऐकूण मी निघाले होते. पुन्हा कदाचित ती भेटेल, की नाही माहिती नाही .पण ही दरी कधीही न भरून निघणारी आहे ह्याची मात्र जाणीव झाली. त्याही पेक्षा खंत ह्या गोष्टीची आहे की खंत वाटुनही मी ह्यांच्यासाठी काहीही करू शकत नाही.
समाप्त.
©Neha R Dhole.

No comments:

Post a Comment