Saturday 25 April 2020

बंदिस्त

   काही दिवसांपूर्वी मी डिजिटल मार्केटिंगवर एक पुस्तक लिहिलं. त्यात माझी एक ओळ होती , हल्ली माणुस हा सोशल प्राणी राहिलेला नाही तर तो सोशलमीडिया प्राणी झालेला आहे. आज सहजच ते वाक्य पुन्हा वाचल्या गेलं आणि माझं मलाच हसु आलं. साधारण दीड महिन्यापूर्वी  ती ओळ लिहीत असताना आपण किती बिझी असतो आज सगळं कसं एका क्लीक वर लागतं. आपलं आयुष्य किती व्यस्त आहे असे सगळे मनात विचार होते. आज मात्र परिस्थिती अगदी विरुद्ध आहे. आज वेळचं वेळ आहे. जो वेळ मिळत नाही म्हणुन आपली सारखी रडारड असायची आज तो मिळाल्यावर काय करावं सुचत नाही आहे. आता 3 मे नंतर लॉकडाऊन ही कल्पना पण नाही करवत...? बरोबर ना. आता करणार काय, कारण सगळ्या रेसीपीज करून झाल्या, त्याचे फोटो काढुन पोस्ट करणं झाले. सगळे खेळ खेळुन संपले. रामायण - महाभारत, शक्तिमान सगळं पाहुन झालं.  सुरवातीला मजा आली, रोज सगळ्यांसोबत व्हिडीओ कॉल , मग त्याचे स्क्रीनशॉट घेऊन फोटो टाकुन झाले, ऑनलाइन लुडो, चेस, सगळं खेळून झालं. सोशलमीडियाचा पूर्णपणे वापर झाला. विनाकारण सकाळी चार -चार पर्यंत जागून  वेबसिरीज बघुन झाल्या, पुस्तके वाचुन झाली. तरीही अस्वस्थता का...?,  आपल्यातले हरवलेले सगळे गुण गवसले असं वाटलं सुरवातीला .पण आता काही दिवसांचा आराम आता शिक्षा वाटायला लागली. आता मात्र घराच्या बाहेर पडावस वाटतं. हो वाटतंच ना! कारण आपल्याला माणसांत राहायची सवय झाली आहे. हो माणुस हा सामाजिक  प्राणी आहे. त्याला समाजापासून वेगळं करणं शक्य नाही. आपण कितीही डिजिटल झालो तरीही आपण चार भिंतीत कोंडुन नाही राहू शकत. हे मात्र ह्यावरून सिद्ध झालं. रविवारच महत्त्व तर आता राहिलंच नाही. ती सुट्टीची हुरहूर संपली.कुठलं प्लॅनिंग नाही, घरच्यांना वेळ देत नाही म्हणुन त्यांची किरकिर नाही,  कुठल्या मित्र-मैत्रिणीला भेटणं नाही,बाहेरचं खाण नाही, सगळं बंद. पण तरीही आयुष्य थांबलं नाही.कारण आपल्याला आशा आहे आज ना उद्या हे सगळं सुरळीत होणार आपण बाहेर पडणार.  ह्या एका आशेवर आपण  धीर धरून आहोत. हल्ली सगळीकडून एकच आवाज येतोय लवकर लॉकडाऊन उघडावा, आणि पिंजऱ्यातुन सुटका व्हावी. आपण कितीही आधुनिकतेचा  आव आणला आणि म्हणालो मला कुणाचीही गरज नाही, किंवा आजकाल कुणाला कुणाशीही घेणदेण नाही तरीही माणसाला माणुस लागतो. हे पुन्हा आपल्याला कोरोना शिकवून गेला. जर असं नसत तर आजही आपलं वर्क फॉर्म होम चालुच आहे. तरीही आपल्याला कंटाळा आला न! उलट घरच्या बेडवर बसुन काम करण्यासारखं सुख नाही. पण आज तेच सुख बोचायला  लागलंय.  तसा सोशल डिस्टन्स हा आपल्याला पाळायचा आहे.  एरवी तर आपलं मन  सोशल डिस्टन्स पाळतच असतं . त्याला अजिबात कुणामध्येही जावं वाटत नाही. सगळ्यांच असच होत नाही का..? पण तरीही आता मात्र त्यालाही लोकांमध्ये जावं वाटतंय कमाल आहे नाही का..?
© Neha R Dhole.

No comments:

Post a Comment